गहिवरलेली मनं...!
शाळा… आयुष्यातील ती जागा जिथे आपण अक्षरओळख करतो, गोड दोस्त मिळवतो, आणि नकळत स्वतःच्या आयुष्याची सुंदर स्वप्नं रंगवतो. इथे शिकलो, वाढलो, खेळलो, रडलो, भांडलो आणि पुन्हा एकमेकांशी अबोल नातंही जोडलं. पण या सगळ्यात एक गोष्ट कायम राहते—शाळेच्या शेवटच्या दिवसाची ती हुरहुर...
वर्षभर बेंचवर जागेसाठी भांडणारे, गृहपाठाच्या वह्या लपवणारे, एकमेकांना चिडवणारे, वाद घालणारे आणि प्रत्येक क्षणी खेळण्यात रममाण होणारे आम्ही... त्या एका शेवटच्या दिवशी मात्र पूर्णपणे वेगळे होतो. ज्यांच्याशी रोज भांडायचो, तेच मित्र त्या दिवशी जवळ बसायला हट्ट करत होते. ज्यांना सतत चिडवत होतो, त्यांच्याकडे प्रेमाने पाहत होतो. जणू काही वर्षानुवर्षांची सोबत आज अचानक सुटणार होती आणि ती भरून काढायला तो एक दिवस पुरेसा नव्हता.
शाळेतील प्रत्येक भिंत, प्रत्येक बाक, ती पाटी, तो फळा... सगळं काही त्या दिवशी जणू डोळ्यांसमोर नाचत होतं. "बेंचवर जागा माझी!", "हे माझं पेन!", "तू माझं टिफिन नको खाऊस!", "सरांनी मला पहिल्यांदा उत्तर द्यायला सांगावं!" अशा लहानसहान गोष्टींवर भांडणारे आम्ही, त्या शेवटच्या दिवशी मात्र एकमेकांचे हात घट्ट पकडून बसलो होतो.
शिक्षकही भावूक झाले होते. ज्यांनी वर्षभर रागावून शिकवलं, ते आज प्रेमाने समोर उभे राहून आम्हाला मार्गदर्शन करत होते. "आता पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा" हे शब्द त्यांच्या ओठांवर होते, पण त्यांच्या डोळ्यांतून वाहणाऱ्या भावना सांगत होत्या की ते देखील आम्हाला मिस करणार होते.
त्या दिवशी वर्गाच्या खिडकीतून बाहेर बघताना जाणवलं, ही तीच खिडकी आहे जिथे आम्ही अनेक स्वप्नं बघितली, अनेक दंगा केला आणि अनेकदा बाहेरचं जग पाहण्याची उत्सुकता बाळगली. पण आज, त्या खिडकीतून बाहेर पाहताना मात्र मनाने मागे वळून फक्त या आठवणीच पाहिल्या.
संध्याकाळी शाळेच्या गेटमधून बाहेर पडताना, प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न—"ही दारं उद्या उघडतील, पण आपण मात्र इथे नसू… ही बाकं उद्या रिकामी असतील, पण त्या आठवणी कायम राहतील..."
मित्रांचा हात हातात घेऊन उंबरठ्यावर उभं राहिल्यावर डोळे पाणावले. हसत-खेळत जगलेल्या या दिवसांचं काय करायचं? या आठवणी कुठे जपायच्या? जरी जीवन पुढे जाईल, नवी स्वप्नं, नवे मित्र भेटतील, तरीही या आठवणींचं खास स्थान असेलच.
आयुष्यभर या दिवसांचा गंध मनात राहणार होता… आणि कधी तरी अचानक, एखाद्या शांत संध्याकाळी, एकटे असताना, हळूच मनात प्रश्न उमटणार होता—
"कधी कधी आठवतं का वर्गात गोड भांडण करणारे शेवटच्या दिवशी मात्र भावूक झालेले?"
© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
No comments:
Post a Comment